मुलांनो, अभ्यास हा शब्दच मुळी तुमचा नावडता. काहींचा तो आवडता असेलही, पण काहीसाठी तो नावडता. कंटाळा, आळस, त्रागा करून अभ्यास करणे, अथवा त्यातून पळवाट म्हणून काही ना काही कारणे शोधणे हे पालकांसाठी व आम्हा शिक्षकांसाठी नवीन नाही.
अभ्यास आनंदाचा करायचा म्हणजे काय करायचे? हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच तुम्हाला माहित असेल की कोणतीही गोष्ट आनंदाने केली तर त्याचे श्रम हे जाणवत नाहीत. या आनंदामध्ये आपण काहीतरी मिळवले आहे, हे समाधान असते. हे समाधान एकदा मिळाले कि त्याचा ध्यास लागतो, ध्येयाकडे वाटचाल होण्याची सुरुवात होते. ह्या दिशेने पाऊल उचलतांना आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद कराव्या लागतील, वाढवाव्या लागतील. हे ज्ञान मिळवतांना एखादी गोष्ट प्रयत्नाने सहज साध्य होईल, एखादी होणार पण नाही, तेव्हा प्रयत्न करणे मात्र सोडू नका. मनाचा निग्रह पक्का असेल, तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही.
अभ्यास ह्याचा अर्थच मुली ‘अध्ययनाचा ध्यास’. हा करत असतांना तुम्ही एक-एक पायरी वर चढत असता, तेव्हा हि प्रत्येक पायरी तुम्हाला तुम्हाला चौफेर लक्ष देऊन चढायची आहे. ही लक्ष देऊन न चुकता न पडता चढता आली कि यशाचे शिखर गाठणे सोप्पे आहे.
अभ्यास आनंदाचा होण्यासाठी आपले भाषा विषय – मराठी, इंग्रजी, हिंदी-संस्कृत यातील पाठ, कविता, सुभाषित, संतसाहित्य याचे रसग्रहण मनापासून रसिक मनाने करा. कवितेतून मिळणारा आनंद अनुभवा. गणिताचे एकदा सूत्र/समिकरण समजले तर अचूक सोडवतांना मिळणारा आनंद घ्या. विज्ञानातून वैज्ञानिक दृष्टीकोन, व रोजचा त्याच्याशी असणारा संबंध याची सांगड जोडा. सामाजिक शास्त्रातून चांगला नागरिक बनण्याचे गमक शिका. सोबत संगीत, कला व योगा यांच्यासंगे जीवनाचा सूर शोध – यातून एखाद्या छंदाचा तुम्हाला शोध लागेल. विरंगुळ्याचे साधन गवसेल.
सुरुवातीला माणूस सवय बनवतो, मग सवयी माणसाला बनवतात. वरील आनंद घेण्यासाठी काही वैयक्तिक बंधन/सवयी आदर्श विद्यार्थी म्हणून आपल्यामध्ये असाव्यात. वेळेचे नियोजन, वक्तशीरपणा, बांधिलकी, स्वयंशिस्त, नम्रपणा, सोबतच नवीन शिकण्याची जिद्द असली कि आपण आनंदी राहणार, अन् अभ्यास आनंदाचा आत्मविश्वास प्रदान करणारा होणारच.
यश देणारा, यशस्वी बनविण्यासाठी लागणारी गुणवत्ता विकसित करू या तेव्हा चला तर मग अभ्यासाला लागू या.
– सौ. स्नेहल काशीकर