Mems

The Blind Relief Association Nagpur’s

Mundle English Medium School

(Integrated)

South Ambazari Road, Opposite Government ITI College, Near Dikshabhumi, Nagpur

भ – भविष्याचा – Mems

          देशभरात पसरलेल्या उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे ‘भारतीय संस्कृती’. आपली संस्कृती ही अनेक प्रसिध्द गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. आपल्या देशात अनेक धर्म, जाती आणि विविध संप्रदायाचे लोक राहतात. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीला “विविधतेनी नटलेली संस्कृती म्हणतात.” “विविधतेत एकता” हे विधान भारत देशामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाने पाहायला मिळते. भारत हा समृध्द  संस्कृतीचा अभिमान बाळगणारा देश आहे, आणि आपण या भारतभूमीत जन्माला आलो हे आपले ‘अहो भाग्यच’ म्हणावे लागेल, नाही का !

          भारतीय संस्कृत्तीत अनेक भाषा, वेशभूषा, लोकसंगीत, आध्यात्मिकता, विविध बहुजन प्रकार आढळतात. तेव्हा या विविधतेने नटलेल्या संस्कृतीला जपणे. हे देखिल आपले आद्य कर्तव्य आहे. आज आपण बघतो आपल्या देशातील भावीपिढीवर, युवकांवर पाश्चात्य देशांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो आहे. परिणामी आपण आपली संस्कृती व संस्कार विसरत चाललो आहे. आज आपल्याला हे थांबवायचे असून हे थांबवण्यासाठी पुढील पाच ‘भ’ चा अवलंब करणे गरजेचे आहे.

भ – भूमी

भ – भाषा

भ – भूषा

भ – भोजन

भ – भजन

         भ – भूमी – ज्या भूमीत आपण जन्मलो त्या भूमीचे, या मातीचे आपण ऋणी आहोत. याच भूमीला गुलामगिरीतून वाचविण्यासाठी अनेक वीर युवकांनी आपले प्राण त्यागले आहे. तेव्हा आता या नवीन पिढीची जवाबदारी आहे की आपल्या या पावन भूमीचे आपण रक्षणकरायला हवे. तसेच यासाठी चांगले शिक्षण घेणे, चांगले आचार-विचार आत्मसात करणे, त्याचप्रमाणे योग्य सुसंगती निवडणे याची गरज आहे. जरी आपण परदेशी शिकलो तरी मायदेशीसाठी नक्कीच करायला हवा. याची जाणीव प्रत्येक भारतीयाला असायला हवी.

        भ- भाषा – प्रत्येकाचा जन्म वेगवेगळ्या धर्म, जातीमध्ये होतो, तेव्हा प्रत्येक व्यक्तींची भाषा देखील वेगळी असते. आपली बोलीभाषा आपल्याला यायलाच हवी. त्यात आपण बोलायला, वाचायला, लिहायला नक्कीच शिकायला हवे. आपल्या मातृभाषेचा व राष्ट्रभाषेचा अवलंब करा व त्याचा अभिमान देखील बाळगावा. जरी आपले शिक्षण इंग्रजीभाषेत झाले असेल तरी आपली मायबोली मराठीला व आपल्या बोलीभाषेला विसरू नका.

        भ-भूषा – हल्लीची नवीन पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे खूप आकर्षित झालेली आढळते. पाश्चात्य देशाचे राहणीमान, त्याचप्रमाणे तेथील कपडे घालण्याची पद्धत याकडे आजची पिढी प्रखरतेने वळलेली दिसते आहे. आपली संस्कृती काय आहे, याचा नवीन पिढीला विसर पडला आहे. मी असे मुळीच म्हणणार नाही की मुलींनी कुर्ता-पैजामा घालून राहावे पण निदान अंग झाकल्या जाईल असे कपडे नक्कीच घालावे.

        भ-भोजन – “आई, “मी पिझ्झा खाणार आहे ! “आई, मला बर्गर, नुडल्स करून दे! आज प्रत्येक घरात रोज हे शब्द ऐकायला येतात. पण या खाण्याने फक्त मनाला समाधान मिळत पण शरीराला मात्र त्यातून काहीच पौष्टिकता मिळत नाही. ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ असे आपण नेहमीच म्हणतो. मानवाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे आरोग्य होय. तब्येत चांगली असेल तर आपण सर्व काही सुरळीत करू शकतो. आपल्याला साधे व सकस आहार घेणे आवश्यक आहे. तसेच वेळेवर झोपणे, लवकर उठणे, व्यायाम, योगसाधना करणे आवश्यक आहे. अन्नामुळे आपल्याला ताकद मिळते. धावणे, खेळणे, चालणे, नाचणे, उद्या मारणे ह्या सर्व शारीरिक क्रियांसाठी ऊर्जा लागते. ही सर्व उर्जा आपल्याला अन्नातून मिळते. तेव्हा आपण नेहमी अ, ब, क, ड, ई हे जीवनसत्वे मिळणारे अन्नच ग्रहण करायला हवे. म्हणून भ-भोजनाचा आवश्यक आहे.

        भ-भजन –आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्लोक मंत्रपठण, सांगितला एक विशेष व महत्त्वाचे स्थान आहे. आजची पिढी अर्थहीन गाणे ऐकण्याकडे व पाश्चिमात्य संगीताकडे जास्ती भर देताना आढळतात. कोणतीही गोष्ट शिकतांना करतांना, ऐकतांना त्यातून काहीतरी चांगले मिळेल, जे श्रवणीय असेल असेच संगीत ऐकणे आवश्यक आहे. संगीत कलेतून अनेक सकारात्मक ऊर्जा मिळण्याची एक ताकद आहे. म्हणून कानाला श्रवणीय वाटणारे संगीत ऐका. त्याचप्रमाणे श्लोक, गीतापठण, रामरक्षा यासारख्या गोष्टी आत्मसात करा व आपल्यातील ऊर्जा वाढवा.

          या सर्वांना ध्यानात ठेवून, चांगले विचार आचरणात आणले आणि कार्य कराल तर तुमचे भ-‘भविष्य’ नक्की सुधारेल याची मला खात्री आहे.

            – (सौ. कलाश्री बरडे)